सचिन स्तोत्र
बॅटधारी महारुद्रा पूर्णरनवान मारुती
रमेशी अंजलीनाथा रनदूता प्रभंजना ||१||
विक्रमानी तुझ्या देवा भरली सर्व दफ्तरे
एकहाती काढिली त्वा अख्तराची लक्तरे ||२||
कसोटी खेळसी जेव्हा, सारे विक्रम तोडिले
लारासी टाकिले मागे , रनासी तुलना नसे ||३||
एकदिवसीय सामन्यात बोलरां धडकी भरे
तयासी तुलना कोठे , पॉटींग कॅलिस धाकुटे ||४||
एक्सप्रेसची होते पॅसेंजर, स्पिनर सरळ होतसे
वॉर्न तो महा बिलंदर तुजला स्वप्नी पाहतसे ||५||
वकारे आपटून ऐसा तुजवर चेंडू सोडीला
नाकावर जाऊन बसता चेहरा रक्ते माखला ||६||
पुढचाच चेंडू झाला लॉंग ऑफला सीमापार
सर्वासी कळले तेव्हा हा जरा वेगळा प्रकार ||७||
वन डे चा तू राजा चॅरीटी करतो बरी
२०-२० व कसोटी धावयंत्र ते चालले ||८||
इतकी वर्षे खेळून तुझी भूक ना भागली
विराट अश्विन रैना मागती तुझी सावली ||९||
कधी पाठ वा कोपर दुखता माकडाहाती कोलीते
सचिन तो सर्वदा शांत त्याची बॅटच बोलते ||१०||
तोडले झोडले फोडले कधी सीमेपार भिरकाविले
सगळ्यांची केलीस शेळी, जे तुझ्यावर गुरकावले ||११||
कधी कठीणसमय येता घेशी हाती बॉल तू
मंदाविशी फटकेबाजा, देशी पटकन ब्रेक-थ्रू ||१२||
स्लीप-गली-कव्हरआदि शॉर्ट-लेग समस्तही
जाती सीमेपाशी आनंदे सचिन दर्शने ||१३||
जिंकविले किती सामने तरी एक इच्छा उरी
विश्वचषक जिंकून देवा तीही तू केली पूरी ||१४|
हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी
दृढदेहो निसंदेहो धावसंख्या चंद्रकळागुणे ||१५||
फलंदाजी अग्रगण्यू मुम्बैकरांसि मंडणू
रनरूपी तू महात्मा शत शतकेधारी तू ||१६|
इति श्री ऋग्वेदकृतं संकटनिरसन नाम सचिनस्तोत्रं संपूर्णं |